जळगाव मिरर । ७ डिसेंबर २०२५
अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकाने शाळा, कॉलेज सोडून शहराबाहेर निर्जनस्थळी प्रेमचाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर धडक कारवाई केली. तर मुलांच्या पालकांना बोलावून त्याना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली तसेच तरुणी पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालयातील अल्पवयीन मुले, मुली अंबर्शी टेकडी, गलवाडे रस्ता, साने गुरुजी स्मारक, डुबकी मारोती, शहराबाहेरील मंदिरे, शिवाजी बगीचा आदी ठिकाणी तसेच काही निर्जन स्थळी शाळा, महाविद्यालय सोडून प्रेमचाळे करत असल्याची तक्रार केली जात होती. तर पो.नि. दत्तात्रय निकम यांनी याची गांभीर्याने दखल घेत दामिनी पथकाला सक्रिय केले. पो.नि. निकम यांनी मोनिका पाटील, नम्रता जरे, श्यामल पारधी, मिलींद सोनार, गजेंद्र पाटील यांना अशा प्रेमी युगुलांवर कडक कारवाईचे आदेश दिले. यानंतर पथकाने ६ रोजी दुपारी अंबर्शी टेकडीवर झुडुपात प्रेम चाळे करणाऱ्या तीघांवर कारवाई केली.
गलवाडे येथील दोन मुली व धुळे येथील रहिवासी असलेली मात्र अमळनेरात आपल्या नातेवाईकांकडे शिकणारी एक मुलगी आणि दोंडाईचा येथील दोन तरुण तसेच गडखांब येथील एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हे तिन्ही युगुल आपली शाळा, महाविद्यालय सोडून याठिकाणी आल्याचे समजताच दामिनी पथकाने सहाही जणांना पोलिसांचा हिसका दाखवला. त्यानंतर त्यांना अमळनेर पोलीस ठाण्यात आणले. पो.नि. दत्तात्रय निकम यांनी त्यांची चौकशी करून सर्वांच्या पालकांना बोलावून मुला, मुलींना समज देऊन त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या या कारवाईनंतर पालकांनी समाधान व्यक्त केले. तर पोलीस निरीक्षक व त्यांच्या दामिनी पथकावर यानिमित्त कौतुकाचा वर्षाव होत आहे.





















