जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५
नाशिक येथील सम्राट वर्मा ग्रुपतर्फे २२ डिसेंबर रोजी एरंडगाव येथील वर्मा लॉन्स येथे एक रुपयात सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीच्या संचालिका मिनल वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात २१ जोडप्यांचे लग्न लावण्यात येणार असून, गरजूंना मदतीचा हात देण्याचा हेतू असल्याची माहिती कंपनीचे संचालक सम्राट वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्याला हिंदी चित्रपट अभिनेते तुषार कपूर उपस्थित राहणार आहेत. विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. तसेच विवाहासाठी डीजे, बँड, पुष्पहार, विवाह मंडप आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
नोंदणी प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून प्रथम येणाऱ्या २१ जोडप्यांची एक रुपयात नोंदणी केली जाईल. वधूचे वय १८ वर्षे आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. वधू–वरांचे ओळखपत्र, वयाचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि आई-वडील व एक साक्षीदार उपस्थित असणे आवश्यक आहे.





















