जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२५
आयकर विभागातील मनिष कुमार सिंग (वय ३७, रा. देवेंद्र नगर) हे कुटुंबासह बिहारला गेले असताना त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. मनिष सिंग हे जळगावला परतल्यानंतर त्यांनी दि. ८ डिसेंबर रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि , मूळचे बिहार राज्यातील पटणा येथील मनिष कुमार सिंग हे आयकर विभागात नोकरीस असून ते जळगावातील देवेंद्र नगरात कुटुंबियांसह वासतव्यास आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी ते कुटुंबियांसह आपल्या मूळ गावी पटणा येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा कापून घरफोडी केली. दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मनिष सिंग यांचा मित्र सुधीर कुमार हे झाडांना पाणी देण्याकरीता त्यांच्या घरी गेले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी घरात जावून बघितले असता, त्यांनाघरातील हॉल आणि बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला.
घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला असल्याने सुधीर सिंग यांनी लागलीच घटनेबाबत मनिष सिंग यांना माहिती दिली. दरम्यान, दि. ८ डिसेंबर रोजी ते बिहार येथून जळगावला परतले. त्यांनी घरातील गोदरेजचे कपाटात ठेवलेले सामान बघितला असता, त्यांना त्यामध्ये ठेवलेले ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले नाही. बंद असलेल्या आयकर विभागातील कर्मचाऱ्याच्या घरात घरफोडी झाल्याची खात्री झाल्यानंतर, मनिष सिंग यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड हे करीत आहे.




















