जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२५
शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बुधवारी वाहतूक शाखेच्यावतीने मोठी कारवाई करण्यात आली. विविध नियम मोडणाऱ्या ६३ वाहनधारकांना दंड ठोठावण्यात आला. तसेच दुचाकी चालविणाऱ्या १५ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत आणले व त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.
विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालविणे अशा प्रकारच्या उल्लंघनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पथकांनी शहरातील विविध भागांत मोहिम राबवून ६३ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
महाविद्यालये व क्लासेस परिसरातही तपासणी करण्यात आली. अल्पवयीनांकडून दुचाकी चालवली जात असल्याचे आढळताच १५ मुलांना वाहतूक शाखेत आणण्यात आले. पहिली वेळ असल्याचे पालकांनी सांगताच त्यांना समज देऊन मुलांना सोडण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई पुढील काळातही सुरू राहणार असल्याची माहिती निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.




















