जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
शहरातील कानळदा रोडवरील लक्ष्मीनगरात दि. ९ रोजी रात्री साडेआठ वाजता काहीही कारण नसतांना वैभव रविंद्र जैस्वाल (वय २१, रा. लक्ष्मीनगर) या तरुणाला मारहाण करीत त्याच्या डोक्यात काचेची बॉटल मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी संशयित तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी नगरात वैभव रविंद्र जैस्वाल हा तरुण वास्तव्यास असून त्याची याच परिसरात पानटपरी आहे. दि. ९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयीत तनवीर उर्फ तन्या शेख रहिम या त्याठिकाणी आला. काहीही कारण नसतांना त्याने वैभव जैस्वाल याच्यासोबत वाद घालून त्याची कॉलर पकडली. तसेच त्याला मारहाण करीत त्याच्या हातातील काचेची बॉटल जैस्वाल याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर वैभव जैस्वाल यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (रा. गेंदलाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश वाघ हे करीत आहे.




















