जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५
जळगाव शहरापासूननजीक असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी स्थापन केलेले हेल्थ केअर सेंटर सध्या एका गंभीर निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. केंद्रातील कार्यरत एक डॉक्टर कामाच्या वेळेतच खुर्चीवर पायवर करून झोपलेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निष्काळजी वर्तनाचा फोटो व्हायरल झाला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवल्यास तातडीने उपचार मिळावेत म्हणून हेल्थ केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, कर्तव्यपालनाच्या वेळेत डॉक्टर झोपेत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील जोखीम वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरोग्याशी संबंधित चुकीची माहिती देणे, उपचारामध्ये विलंब होणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत योग्य दिशा न मिळणे अशा अनेक धोक्यांकडे या घटनातून लक्ष वेधले जात आहे.
विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच आरोग्य सेवेत जबाबदारी, दक्षता आणि संवेदनशीलता कायम ठेवणे आवश्यक असल्याचा जोरदार सूर विद्यार्थ्यांतून उमटत आहे. या घटनेमुळे हेल्थ केअर सेंटरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर आता काय कारवाई होते याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





















