जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५
बँकेत पैसे भरण्यासाठी आलेले सतीश दशरथ चौधरी (५७, रा. मयूर कॉलनी) यांना पैसे मोजून देण्यासाठी मदत करण्याचे सांगत दोन जणांनी हातचालाखीने १३ हजार रुपये लांबविले. ही घटना दि. २८ नोव्हेंबर रोजी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध दि. १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मयूर कॉलनीतील रहिवासी सतीश चौधरी हे त्यांच्या मित्राच्या मुलीला ५० हजार रुपये पाठविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत गेले. तेथे ते स्लिप भरत असताना शेजारी बसलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांना स्लिप भरण्याविषयी माहिती दिली. त्यानंतर चौधरी यांनी खिशातून ५० हजार रुपयांची रोकड काढली असता दोघांनी त्यांच्या हातातून पैसे घेत आम्ही मोजून देतो असे सांगितले.
दोघांनी अर्धे पैसे वाटून घेत मोजले व चौधरी यांना परत करून ५० हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर चौधरी यांनी रक्कम कॅशिअरकडे दिली असता त्यात १३ हजार रुपये कमी असल्याचे आढळले. त्यावेळी चौधरी यांनी दोघा तरुणांचा शोध घेतला, मात्र ते तेथून पसार झाले होते. या प्रकरणी चौधरी यांनी दि. १३ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली.




















