जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५
मुंबई–ठाण्यासह राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानुसार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यात जळगाव मनपाची देखील निवडणूक आहे.
या महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरातून सुमारे ३ कोटी ४८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांकडून तयारीला वेग आला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका गेल्या ५ ते ७ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, सुरुवातीला २ डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता प्रलंबित महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपलेली असून, त्यासोबतच जालना आणि इचलकरंजी या दोन नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांच्याही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ही मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने, त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता प्रचाराला वेग येणार असून, उमेदवारांच्या भेटीगाठी, प्रचारसभा आणि राजकीय हालचालींना जोर येण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक
-
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
-
अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
-
उमेदवारी माघार : 2 जानेवारी
-
चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी
-
मतदान : 15 जानेवारी
-
मतमोजणी व निकाल : 16 जानेवारी




















