जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२५
नवीन वीजमिटर बसविण्यासाठी आधी चार हजार रुपयांची लाच घेऊनही काम न केल्याने चौकशीसाठी गेलेल्या डॉक्टरकडून पुन्हा दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आत्माराम धना लोंढे (वय ५७, पद – वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण) असे आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे डॉक्टर असून त्यांनी मुलाच्या नावे नवीन वीजमिटर घेण्यासाठी महावितरणचे वायरमन आत्माराम लोंढे यांच्याशी संपर्क साधला होता. वीजमिटर बसविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची चौकशी केली असता, लोंढे यांनी काम करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार डॉक्टरांनी संबंधित रक्कम दिली. मात्र, पैसे घेतल्यानंतरही आरोपीने वीजमिटर बसविले नाही.
यानंतर तक्रारदाराने पुन्हा वीजमिटरबाबत विचारणा केली असता, आरोपीने आणखी दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे वैतागलेल्या डॉक्टरांनी १५ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपी आत्माराम लोंढे यांना पंचासमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.




















