जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात मंगळवारी (दि. १६) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट शाळेलगतच्या नाल्यात पडल्याने दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्सरी वर्गात शिकणारी ही दोन्ही बालके शाळेच्या आवारात खेळत असताना वर्गाबाहेर गेली. खेळता खेळता ते संरक्षक भिंतीजवळ पोहोचले आणि अचानक तोल गेल्याने भिंतीवरून थेट नाल्यात पडले. नाल्याच्या पाण्यात बुडाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यावर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी शालेय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणतीही जाळी अथवा अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्या वेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवण्यात आली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर दोषी शालेय प्रशासनावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. भडगाव शहरात या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




















