जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२५
घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाच पतीने बनावट घटस्फोटाचे दस्तऐवज सादर करून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह त्याची दुसरी पत्नी आणि नातेवाईक, सहकारी अशा एकूण नऊ जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवकॉलनी येथे राहणाऱ्या वैशाली स्वप्नील चौधरी (वय ३७) यांचा विवाह १८ मे २०१३ रोजी धुळे येथील स्वप्नील अरुण चौधरी यांच्याशी झाला होता. वैवाहिक वादातून घटस्फोटाचा दावा न्यायालयात दाखल असून तो अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान न्यायालयीन कामकाजासाठी वैशाली चौधरी न्यायालयात आल्या असता त्यांची ओळख कविता किरण सपकाळे यांच्याशी झाली. यावेळी कविता यांनी आपली बहीण राजश्री रोहिदास कोळी उर्फ राजश्री स्वप्नील चौधरी हिचे स्वप्नील चौधरीसोबत २० मे २०२४ रोजी लग्न झाल्याचे सांगितले.
पतीने दुसरे लग्न केल्याची माहिती मिळताच वैशाली चौधरी यांनी राजश्रीच्या वडिलांशी संपर्क साधला. चौकशीत राजश्री हिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले. तसेच स्वप्नील चौधरी, राजश्री आणि तिच्या कार्यालयातील सहकारी राजेश पाटील यांनी घटस्फोट झाल्याचे बनावट कागदपत्रे दाखविल्यानेच हे लग्न लावून दिल्याचे स्पष्ट झाले.
या संपूर्ण प्रकरणात फसवणूक व बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप करत वैशाली चौधरी यांनी १५ डिसेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी पती स्वप्नील चौधरी, दुसरी पत्नी राजश्री चौधरीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलिस करीत आहेत.




















