जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२५
ऑनलाइन अॅपवर घर (फ्लॅट) शोधण्याचा प्रयत्न चितोडा (ता. यावल) येथील तरुण महिलेला चांगलाच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठगाने फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली २९ वर्षीय महिलेकडून तब्बल २ लाख ३८ हजार ३१९ रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोमवार, १५ डिसेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चितोडा गावात राहणाऱ्या कल्याणी नितीन महाजन (वय २९) यांनी ६ डिसेंबर रोजी ‘नो ब्रोकर’ या ऑनलाइन अॅपवर फ्लॅट शोधण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ‘रमाकांत कुमार’ असे नाव सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधत फ्लॅट उपलब्ध असल्याचे सांगितले. आरोपीने विश्वास संपादन करत फ्लॅट बुकिंग, टोकन अमाऊंट, डिपॉझिट तसेच परत मिळणारी रक्कम (रिफंडेबल) असल्याचे सांगून वेगवेगळ्या टप्प्यांत पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले.
या बहाण्याने आरोपीने कल्याणी महाजन यांच्या बँक खात्यातून स्वतःच्या खात्यावर एकूण २ लाख ३८ हजार ३१९ रुपये ऑनलाइन जमा करून घेतले. मात्र, पैसे ट्रान्सफर झाल्यानंतरही फ्लॅटचे बुकिंग न होता संबंधित व्यक्तीचा मोबाईल बंद येऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर कल्याणी महाजन यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसलोदिन शेख करीत आहेत.




















