जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२५
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात दिलेल्या नियुक्तीपत्रात आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
आगामी जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या प्रमुख नेत्यांशी समन्वय साधून एकदिलाने निवडणूक लढविण्यात आमदार मंगेश चव्हाण यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महायुतीतील दोन्ही घटक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत व स्नेहपूर्ण संबंध असल्यामुळे सर्व पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याची जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विविध नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतील सर्व पक्ष व नेत्यांना एकत्र आणत प्रभावी नियोजन व समन्वय साधला होता. त्या निवडणुकांतील यशस्वी कामगिरीमुळेच त्यांच्यावर थेट जळगाव महापालिकेची निवडणूक जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या नियुक्तीमुळे आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रदेश पातळीवरील राजकीय वजन वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.




















