जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५
आई साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेलेली असताना निलेश मिलींद पाटील (वय २५, रा. ओंकार नगर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ओंकार नगरात निलेश पाटील हा तरुण आईसोबत वास्तव्यास होता. दि. १७ रोजी त्याची आई साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गावाला गेली होती. यावेळी निलेश घरी एकटाच होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने छताला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. सायंकाळी आई घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ठोठावून आवाज दिला, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता निलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे दृश्य पाहताच आईने एकच आक्रोश केला.
आक्रोशाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निलेशला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.




















