जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. ‘निष्ठावंत विरुद्ध आयात’ असा नवा अंतर्गत संघर्ष उभा ठाकल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये तब्बल पाचशेच्यावर इच्छुकांनी हजेरी लावली असून, अजूनही अनेक जण रांगेत असल्याची माहिती आहे.
गेल्या काही महिन्यांत उद्धव सेनेसह इतर पक्षांतील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, जयश्री महाजन, सुनील महाजन आणि प्रशांत नाईक या माजी नगरसेवकांच्या आगमनामुळे पक्षाची ताकद वाढली असली, तरी मूळ व वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यावेळच्या निवडणुकीत आजी-माजी आमदार व नगरसेवकांच्या नातेवाइकांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केल्याचे चित्र आहे. ‘घराणेशाहीला थारा देणार नाही’ असा दावा करणाऱ्या पक्षांकडून नेत्यांच्या मुलांना किंवा पत्नींना तिकीट मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निष्ठावंत कार्यकर्ते करू शकतात बंडखोरी
जर उमेदवारीत घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आले, तर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोरी किंवा पक्षांतराच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपची अंतिम उमेदवार यादी जाहीर होताना निष्ठावंतांना न्याय मिळतो की केवळ ‘निवडून येण्याची क्षमता’ पाहून बाहेरून आलेल्यांना झुकते माप दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, राजकीय साठमारी सुरू असतानाच सर्वसामान्य जळगावकर मात्र आजही मूलभूत समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहेत. शहरातील खड्डेमय रस्ते, अर्धवट ड्रेनेजची कामे आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडी या प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. निवडणूक जाहीर झाली की आश्वासनांची खैरात होते; मात्र निकालानंतर हे प्रश्न पुन्हा ‘जैसे थे’ राहतात, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
आ.भोळे कार्यकर्ते नाराज
मनपा निवडणुकीसाठी आ.मंगेश चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे तर आ. सुरेश भोळे यांना निवडणूक प्रचार प्रमुखांची जबाबदारी दिल्याने आता भाजप अंतर्गत दोन गट निर्माण झाल्याचे दिसत असून यात आ. भोळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.





















