जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२५
मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून एका माथेफिरू तरुणाने आपल्या वृद्ध आई-वडिलांची डोके ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. अवघ्या दीड गुंठ्याच्या प्लॉटमधील अर्ध्या गुंठ्याच्या वाटणीसाठी आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ही भीषण घटना हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावातील महावीर नगर येथे घडली. नारायण गणपतराव भोसले (वय ८२) आणि विजयमाला नारायण भोसले (वय ७०) अशी निर्घृण हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तर त्यांचा मुलगा सुनील नारायण भोसले (वय ४८) हा या प्रकरणातील आरोपी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंबाकडे हुपरीत दीड गुंठ्याचा प्लॉट असून त्यातील अर्ध्या गुंठ्याच्या वाटणीवरून आरोपी सुनीलचा आई-वडिलांशी सतत वाद होत होता. नारायण भोसले आणि त्यांची पत्नी विजयमाला हे घरात राहत होते. त्यांना चंद्रकांत, संजय आणि सुनील अशी तीन मुले असून चंद्रकांत व संजय हे नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात. सुनील हा घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहत होता.
सुनील हा किरकोळ कारणांवरून आई-वडिलांना नेहमीच शिवीगाळ व मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. महिनाभरापूर्वीच त्याने काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र नंतर माफी मागितल्याने वृद्ध दाम्पत्याने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली नव्हती.
गुरुवारी रात्री भोसले दाम्पत्य झोपले असताना पहाटे सुमारे ५.४५ वाजता आरोपीने घरात प्रवेश केला. त्याने प्रथम वडिलांच्या डोक्यावर लाकडाने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे घरातील शोकेसची काच फुटली. त्यानंतर त्याच फुटलेल्या काचेने आई-वडिलांच्या हातांच्या नसाही कापल्या. या अमानुष हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनास्थळी आईच्या अंथरुणावर तुटलेले मंगळसूत्र आणि फुटलेल्या बांगड्यांचा खच आढळून आला.
आरडाओरड ऐकून शेजारी आणि चुलत वहिनी राजमाता यांनी फोनवरून ही माहिती संजय भोसले यांना दिली. त्यानंतर त्या घराकडे गेल्या असता आरोपी सुनीलने फरशीचा तुकडा त्यांच्यावर फेकून मारला. त्यामुळे जीवाच्या भीतीने त्या पळून गेल्या आणि कुणीही भोसले यांच्या घराकडे जाण्याची हिंमत केली नाही.
आई-वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने बांबूचे दांडके आणि विळ्याचे पाते बाथरूममध्ये धुवून आपल्या शेडजवळील भिंतीलगत ठेवले. त्यानंतर घराचे गेट बंद करून तो बाहेर निर्विकारपणे बसून राहिला. कोणी जवळ आले तर हल्ला करण्याची धमकी देत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेमुळे हुपरी गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वृद्ध आई-वडिलांच्या निर्घृण हत्येने नातेसंबंध आणि मानवी संवेदनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.





















