जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२५
राज्यातील उद्धव व राज ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ निवडणुकीचा फंडा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही हे 4 वर्षांच्या पोरालाही कळते. उद्धव ठाकरे यांची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. या घिसीपिटी कॅसेटला आता कुणीही विचारत नाही, असे ते म्हणालेत.
उद्धव व राज ठाकरे यांनी आज आपल्या राजकीय युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईला महाराष्ट्र, मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा आहे हे जनतेला माहिती झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाच्या 4 वर्षाच्या पोराला सुद्धा कळते व महाराष्ट्राच्या जनतेलाही कळते की, मुंबई ही महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. हे कुणीही करू शकत नाही.
उद्धव ठाकरेंची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. त्या घिसीपिटी कॅसेटला आता कुणी विचारत नाही. व्होटचोरी व मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे या दोन गोष्टी आता लोकांना पटत नाही. त्यांनी कितीही निवडणुकीचा मुद्दा बनवला, तरी उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक निवडणुकीत असे बोलतात त्याला काही अर्थ नाही.
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वतःची माणसे सांभाळता येत नाहीत. त्यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाहीत. म्हणून ते या पद्धतीने बोलत आहेत. जनतेचा व कार्यकर्त्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी स्वतःच संपवला आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते व नेते त्यांना सोडून गेलेत. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्याला लोकांनी का सोडले. आपल्याला आमदारांनी का सोडले, आपल्याला गावोगावचे लोकं का सोडत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज एवढी परिस्थिती वाईट आहे की, नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठीही त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे मुंबई तोडण्याचा मुद्दा गौण ठरणार आहे. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात भावनिक आवाहन चालणार नाही. जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही. महाराष्ट्रातील जनता सुजान आहे. विकसित मुंबईलाच मतदान करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र व विकसित मुंबई करू शकतात. हे मराठी माणसांना व मतदारांना माहिती आहे. आम्ही सर्वजण मराठी माणसे आहोत. आम्ही इंग्रजी लोकं आहोत का? आम्ही लंडनहून इकडे राहण्यासाठी आलोत का? आम्ही महाराष्ट्राचे मराठी माणसे आहोत. महायुतीमधील सर्वच लोकं मराठी माणसे आहेत. त्यामुळे मराठी- मराठी करून तुम्ही मराठी भाषेचाही अपमान केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान तुम्ही केला. त्यामुळे काहीही होणार नाही. मतदान भावनेच्या मुद्यावर होणार नाही. खरे तर हे मतदान विकसित मुंबईसाठी होणार आहे. त्यामुळे काहीही सांगितले तरी, फार वाट लागणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे एवढीच मते मिळणार आहेत.




















