जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२५
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर जळगावच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटले आहेत. या ऐतिहासिक युतीच्या स्वागतासाठी जळगावात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
राज–उद्धव युतीची घोषणा होताच जळगावातील आकाशवाणी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मनसे व उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्यासह उबाठा गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमांवर पुष्पवृष्टी करून युतीचे स्वागत करण्यात आले.
कधीकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. “आता बदल घडणारच”, “राज–उद्धव एकत्र, महाराष्ट्र होणार मजबूत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही या युतीच्या स्वागताचे कार्यक्रम सुरू असून, आगामी निवडणुकांमध्ये ही युती सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत या युतीमुळे चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठी मतांचे विभाजन थांबेल, तसेच मनसेची आक्रमक भूमिका आणि उबाठा गटाची संघटनात्मक ताकद एकत्र आल्यास विरोधकांना कडवी झुंज द्यावी लागेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राज्यात झालेली ही युती ऐतिहासिक असून जळगाव जिल्ह्यातही आम्ही एकदिलाने काम करू. ही युती परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी व्यक्त केला.




















