जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेची युती अधिकृत जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. युतीतून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने तयारीला लागलेले अनेक प्रभागांतील इच्छुक उमेदवार आता डावलले जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने त्यांनी आपला मोर्चा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील गट व महाविकास आघाडीकडे वळविला आहे.
भाजप–शिंदे युतीमुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्याने अनेक प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक तर जागा मर्यादित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दीर्घकाळ पक्षासाठी काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळते की बाहेरून आयात करण्यात आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीसह महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र असून, भाजप–शिंदे युतीत नाराज झालेल्या इच्छुकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. काही प्रभागांमध्ये इच्छुकांनी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचेही बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता असून, येत्या काळात कोणत्या पक्षात किती नेते व इच्छुक प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती निष्ठावंतांना संधी देणार की आयात उमेदवारांवर भर देणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.




















