जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२५
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “मुंबईत महापौर कोणाला करायचा यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे,” असा ठाम दावा फडणवीस यांनी केला. आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नसून विचारांची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची लढत सर्वाधिक चर्चेत असून, मराठी अस्मिता, नेतृत्व आणि सत्तासमीकरणांमुळे प्रचाराला वेगळीच धार आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार,” असे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत त्यांनी निवडणूक रणनितीची दिशा स्पष्ट केली.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुंबई ही कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा विषय नाही. “मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढायचं आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केली. तसेच भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
फडणवीस म्हणाले, “निवडणूक ही भावनिक मुद्द्यांवर नव्हे, तर कामगिरीवर लढली पाहिजे. मुंबईकरांसाठी कोण काम करू शकतो, हा खरा प्रश्न आहे.” त्यांनी भाजपाच्या मुंबईतील इतिहासाचाही उल्लेख करत सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतच भाजपाचा जन्म झाला असून, अटलजींचे भव्य आणि योग्य स्मारक मुंबईत उभारण्याची भाजपाची भूमिका आहे.
“आमची लढाई सत्तेसाठी नाही, तर मुंबईकरांच्या हितासाठी आहे,” असे ठामपणे सांगत फडणवीस यांनी महायुतीच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर रंगत आलेल्या बीएमसी निवडणुकीत आता विचार, विकास आणि कामगिरी या मुद्द्यांवरच खरी लढत होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.




















