जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२५
सबला उत्कर्ष फाउंडेशन, पडेगाव (छत्रपती संभाजीनगर) जिल्हा युनिटच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाप्रयाण दिन, राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मृती दिवस आणि स्त्री-मुक्ती दिनानिमित्त एक दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर रांजणगाव (शेणपुंजी) येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे उत्साहात संपन्न झाले.
या प्रबोधन शिबिरासाठी आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक संदीप ते. तेंडोलकर आणि प्रगल्भ अभ्यासक पी.यू. बनसोडे गुरुजी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, राष्ट्रसंत गाडगेबाबांचे सामाजिक कार्य तसेच स्त्री-मुक्ती चळवळीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सबला उत्कर्ष फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राजश्री राहुल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी कु. जागृती चौधरी (उपाध्यक्ष), निरंजन खैरनार (सचिव व तालुका संयोजक, जोगेश्वरी), राहुल परदेशी (सहसचिव), सौ. आशा निकाले (सदस्य), ॲड. आम्रपाली वाव्हाळे (जिल्हा संयोजक, छत्रपती संभाजीनगर), विलासबाबा गायकवाड (तालुका संयोजक, खुलताबाद), अनिलकुमार तांदळे (जिल्हा संयोजक) यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमात बोलताना अध्यक्षा सौ. राजश्री चौधरी यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत महत्त्वाची घोषणा केली. “लवकरच महिलांसाठी तीन दिवसांचा स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. या अंतर्गत 40 महिलांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साहित्य, कर्जसुविधा, उद्यम आधार नोंदणी तसेच तीन दिवसांचे शासकीय प्रमाणपत्र देण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःच्या बळावर रोजगार उभारण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रबोधन शिबिरामुळे सामाजिक जागृतीसोबतच महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.




















