जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५
बी.यू.एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘एक्सझुबेरेंट’ हा भव्य कार्यक्रम दि. २४ रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात उत्साहात पार पडला. नाट्य, समूह नृत्य व विविध सादरीकरणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील मूल्यांची जाणीव करून देत आधुनिक समाजातील बदलांवर प्रभावी चिंतन मांडण्यात आले. सर्जनशीलता, संस्कृती आणि आधुनिक संकल्पनांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
या स्नेहसंमेलनात ३६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, रोबोटीक्स, सूत्रसंचालन आदी विविध कला प्रकारांत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांच्यासह संचालक, शिक्षक व पालक संघाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
वृद्धाश्रमावरील संवेदनशील नाटिका तसेच छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा केला. विविध गीतांच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या वेशभूषांचे दर्शन घडले. रोबोटीक्स सादरीकरणातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होत असल्याचे पालकांनी अनुभवले. याचवेळी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कावेरी नितीन सुरवाडकर हिने महिलांसाठी स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करून विशेष दाद मिळवली.
विद्यार्थ्यांच्या जन्मजात कौशल्यांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट’ या उपक्रमाचे महत्त्व प्राचार्य मनोज शिरोळ यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी व इतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थी व कलाकारांचा गौरव करण्यात आला. हा स्नेहसंमेलन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रभावी मंच ठरला.




















