जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीची घोषणा होताच जळगावच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. युतीमुळे सत्ता समीकरणे जरी मजबूत होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात भाजपमधीलच अनेक इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असून नाराजीचा स्फोट होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. तिकीटाच्या अपेक्षेने वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते आता डावलले जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप–शिवसेना युतीनंतर तिकीट वाटपाचे गणित पूर्णपणे बदलले असून अनेक प्रभागांतील इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यामुळे नाराज उमेदवारांनी पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास सुरुवात केली आहे. काहीजण अन्य पक्षांशी संपर्क साधत आहेत, तर काहीजण स्वतंत्र किंवा नव्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षांतील नेते व इच्छुकांना पक्षात प्रवेश दिला होता. त्या वेळी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली होती. आता त्याच धर्तीवर जळगावमध्येही निवडणुकीच्या काही महिन्यांआधी विरोधी पक्षांतील अनेकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यातच आता शिवसेनेसोबतची युती झाल्याने भाजपच्या एका गटात नाराजी आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे. नाशिकप्रमाणेच जळगावमध्येही ही नाराजी उघडपणे व्यक्त केली जात नसली, तरी अंतर्गत बैठका, खलबते आणि राजकीय हालचाली वेग घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
युतीमुळे तिकीट वाटपाचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे इच्छुक एकमेकांसमोर उभे ठाकले असून, मर्यादित जागांमुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याबाबत अनिश्चितता वाढली आहे. पक्षासाठी दीर्घकाळ झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांऐवजी नव्या पक्षप्रवेश केलेल्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा असल्याने असंतोष खदखदत आहे.
नाराज इच्छुक उमेदवार आता गप्प बसण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसते. काही जण नव्या आघाडीची रणनीती आखत असून, काहींनी थेट बंडखोरीची भाषा सुरू केल्याचीही चर्चा आहे. हे चित्र कायम राहिले, तर भाजप–शिवसेना युतीला अपेक्षित फायदा होईल की मतविभाजनामुळे नुकसान होईल, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जळगाव महापालिकेची निवडणूक स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सत्ता मिळवण्यासाठी करण्यात आलेली युतीच जर अंतर्गत नाराजीमुळे अडचणीत आली, तर विजयाचे गणित कोलमडू शकते. नाराज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांत गेले किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले, तर मतांची विभागणी होऊन युतीच्या विजयावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना नेतृत्वासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे ही नाराजी वेळेत शांत करणे. तिकीट वाटपात पारदर्शकता नसेल आणि कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आले, तर जळगाव महापालिकेची निवडणूक युतीसाठी सोपी न राहता अत्यंत अडचणीची ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात जळगावच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे दृश्य पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.




















