जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५
रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज (२६ डिसेंबर) सकाळी घडलेल्या एका भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांची सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगेश काळोखे हे स्थानिक पातळीवर परिचित व्यक्तिमत्त्व होते. यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिले होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असतानाच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून घटनास्थळी आले होते. त्यांनी तोंडाला रुमाल अथवा कापड बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. काही क्षणांतच धारदार शस्त्रांनी मंगेश काळोखे यांच्यावर अमानुष हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. सकाळची वेळ आणि परिसरात वर्दळ असतानाही इतक्या निर्भयपणे हा हल्ला करण्यात आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील पुरावे गोळा केले असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तसेच, हल्लेखोरांनी वापरलेल्या काळ्या वाहनाचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मंगेश काळोखे यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, या गुन्ह्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस सर्व बाजूंनी करत आहेत. सध्या आरोपी फरार असून, त्यांना लवकरात लवकर अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. आरोपी अटकेत आल्यानंतरच या धक्कादायक घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.




















