जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२६
महापालिका निवडणुकांत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुका लढवल्या असून त्यांना अतिशय चांगले यश मिळाले, असे त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यातील २९ महापालिकांमध्ये पक्षाला केवळ १६७ जागांवर समाधान मानावे लागले. विशेषतः पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती असूनही केवळ ३० जागा मिळाल्या, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत फक्त ३७ जागांवरच यश मिळाले. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, “लोकशाहीत मतदार राजा फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. यावेळी भाजपला अतिशय चांगले यश मिळाले आणि इतरांचा पराभव झाला. मी भाजपचे मनापासून अभिनंदन करतो. पराभवाने खचून जायचे नसते, पुन्हा नव्या जोमाने आपले काम करत राहायचे असते.”
“मीडियासह आमचेही अंदाज चुकले,” असे स्पष्ट करताना ते म्हणाले की, पहाटे तीन वाजेपर्यंत काही ठिकाणचे निकाल लागत होते. त्यानंतर आम्ही बसून नेमके कुठे काय झाले, याचा आढावा घेणार आहोत. मीडियालाही चांगले वातावरण वाटत होते, मात्र आमचे आणि मीडियाचे दोन्ही अंदाज चुकले.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “सध्या निवडणुकीची घाई आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. ५० टक्के आरक्षणाच्या चौकटीत येणाऱ्या १२ जिल्हा परिषदांबाबत स्थानिक भौगोलिक व राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आमचे स्थानिक पदाधिकारी योग्य तो निर्णय घेतील.”
ते पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना निर्णयस्वातंत्र्य दिले जाते. सध्या केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असून आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.




















