जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२६
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक महिलांना अद्यापही हे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात महिलांचा तीव्र संताप शनिवारी उफाळून आला. संतप्त लाडक्या बहिणींनी मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग रोखत चक्काजाम आंदोलन केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात महिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अवजड वाहनांसह खासगी वाहने अडकून पडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
आंदोलन करणाऱ्या महिलांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे मानधन खात्यात का जमा झाले नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. महानगरपालिका निवडणुकीआधी दोन महिन्यांचे हप्ते एकाचवेळी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. तातडीने पैसे जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
दरम्यान, या योजनेतील काही लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळली गेल्याचेही समोर आले आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी किंवा माहिती अपलोडमधील चुका यामुळे काही महिलांना मानधन मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, “योजना आमच्यासाठी आहे, मग चुकांची शिक्षा आम्हाला का?” असा सवाल करत महिलांनी संताप व्यक्त केला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस व प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित खात्याशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच पैसे खात्यात जमा करण्यात येतील, तसेच यादीतून वगळलेल्या नावांची पुन्हा पडताळणी केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मात्र या आंदोलनामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत राहिली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनचालकांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली.




















