जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२६
भावजयीच्या अंत्यसंस्काराहून माघारी परतणाऱ्यास बसने धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने प्रल्हाद अमृत बाविस्कर (वय ६०, रा. मन्यारखेडा, ता. भुसावळ) हे समोरुन येणाऱ्या कंटेनरखाली येवून चिरडल्या गेल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी सुनीताबाई बाविस्कर या गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवार दि. १७ रोजी दुपारच्या सुमारास कंडारी फाट्यावर घडली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथे प्रल्हाद बाविस्कर हे वास्तव्यास होते. त्यांच्या भावजयीचे निधन झाल्याने प्रल्हाद बाविस्कर हे पत्नी सुनीताबाई बाविस्कर यांच्यासोबत विटनेर येथे जाण्यासाठी (एमएच १९, ईडी ९३३९) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर हे दुचाकीने मन्यारखेडा येथे घरी परतत होते. नेरीकडून येत असताना मागून येणाऱ्या बारामती- रावेर या (एमएच १४, एमएच ७४०१) क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
त्यामुळे दुचाकी विरुद्ध दिशेने गेली व समोरून येणाऱ्या (एमएच १९, सीएक्स ३२८९) क्रमांकाच्या कंटेनरच्या पुढील चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्याने प्रल्हाद बाविस्कर हे जागीच ठार झाले. तर या अपघातात त्यांच्या पत्नी सुनिताबाई बाविस्कर या गंभीर जखमी झाल्या आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त बस आणि कंटेनर पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.




















