जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२६
जळगाव येथील भरारी फाऊंडेशन आणि क्रेडाई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई महोत्सवाचे ११ वे वर्ष जळगावात दि. २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत बॅ. निकम चौक, सागर पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी व विनोद ढगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा आणि महिला बचत गट व लघु उद्योजकांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव यंदा अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे. महिला बचत गट व लघु उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळवून देणे व त्यातून त्यांची आर्थिक उन्नती साधणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे बहिणाबाई खाद्य महोत्सव. भरीत-भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळी यांसह खान्देशातील विविध पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद जळगावकर नागरिक या ठिकाणी घेणार आहेत.
यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत बाबा सत्यनारायण मौर्य यांचा ‘भारत माता की आरती’, सुप्रसिद्ध लावणी कलाकार शशिकांत सरवदे (बीड) यांचा ‘ही लावणी महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम तसेच दोंडाईचा येथील कीर्तनकार रविकिरण महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दरवर्षीप्रमाणे मराठी संस्कृतीचा फॅशन शो, शाहीरी, भारूड, लोकनृत्य, लोकगीते, वहीगायन आदी लोककलांचा जागर होणार आहे. शालेय व महाविद्यालयीन युवा कलाकारांसाठीही हा मंच खुला ठेवण्यात आला आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग व महिला विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गत दहा वर्षांत जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिली असून, यंदाही सुमारे एक लाख नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. जळगावच्या सर्वात मोठ्या लोकउत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





















