जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२६
लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक व आशयात्मक चुकीमुळे राज्यातील तब्बल २४ लाखांहून अधिक महिला लाभार्थींना चुकीने सरकारी कर्मचारी म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. या चुकीमुळे संबंधित महिलांची मासिक आर्थिक मदत अचानक थांबवण्यात आली. महिला व बाल कल्याण विभागाने ही चूक मान्य करत लाभार्थींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी राज्यभरातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावण्यात आल्याची माहिती दिली आहे.
ई-केवायसी फॉर्ममधील एका प्रश्नाची रचना गोंधळात टाकणारी असल्याने ही चूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठीत विचारलेला प्रश्न — “तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना?” — या प्रश्नात दोन नकारात्मक शब्दांचा वापर करण्यात आल्याने अनेक लाभार्थी गोंधळल्या. ‘नाही’ असे उत्तर अपेक्षित असताना अनेक महिलांनी चुकून ‘होय’ असे उत्तर दिले. परिणामी सुमारे २४ लाख लाभार्थी महिलांनी होकारार्थी उत्तर दिले.
या उत्तरांचा अर्थ कुटुंबातील किमान एक सदस्य सरकारी कर्मचारी असल्याचा काढण्यात आला आणि प्रणालीने आपोआप या महिलांचे मासिक पेमेंट थांबवले, अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्याने दिली. डेटा पुनरावलोकनादरम्यान ही चूक उघडकीस आली. कारण महाराष्ट्रात निम-सरकारी संस्था व महामंडळांतील कर्मचाऱ्यांसह एकूण सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ८ ते ९ लाखांच्या आसपास आहे.
दरम्यान, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वरील पोस्टद्वारे सांगितले की, चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. ई-केवायसी मोहीम सुमारे २.३० कोटी लाभार्थींसाठी राबवण्यात आली होती. योजनेतील पात्रता निश्चित करणे हा या मोहिमेचा उद्देश असून, ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती.
पुरुष लाभार्थी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारीनंतरच ही ई-केवायसी मोहीम हाती घेण्यात आली होती. पडताळणीदरम्यान या योजनेचा गैरवापर झाल्याचेही समोर आले आहे. केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेत १४,२९८ पुरुषांनी लाभ घेतल्याचे, तसेच १,५०० हून अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे आर्थिक मदत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य सरकारकडून आता प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र महिलांचे थांबवलेले लाभ पुन्हा सुरू केले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.




















