जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कानळदा येथील २४ वर्षीय तरूणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथे दीपक संजय धनगर(वय-२४) हा तरुण हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. मंगळवारी २६ जुलै रोजी ९ दीपकने कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर तो वरच्या मजल्यावरील रुममध्ये गेला. याठिकाणी दीपकने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाला तरी दीपक खाली न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी वर जावून पाहिले असता, दीपक हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. कुटुंबियांनी त्याला खाली उतरवित तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्याची तपासणी करीत त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी मंगळवारी २६ जुलै रोजी रात्री उशीरा तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास साहेबराव पाटील, माणिक सपकाळे हे करीत आहे.
