जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२६
जळगावकर आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘१२८ स्लाईस सीटी स्कॅन मशीन’चा भव्य उद्घाटन समारंभ येत्या सोमवारी, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे.
या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या १२८ स्लाईस सीटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांच्या निदानाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होणार आहे. विशेषतः हृदयविकार, अपघात आणि गंभीर आजारांच्या वेळी तातडीने रिपोर्ट मिळण्यासाठी या मशिनचा मोठा फायदा होणार आहे. शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळणार आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता तथा क्ष किरण विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या सुविधेमुळे जळगावच्या आरोग्य क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला गेला असून, खाजगी रुग्णालयांच्या महागड्या चाचण्यांपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.




















