जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा आघात झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत भावूक शब्दांत शोक व्यक्त करत, “आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. अजित पवारांसारखा कार्यक्षम, रोखठोक आणि दिलखुलास नेता आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ‘बेचव’ व ‘आळणी’ होईल,” असे म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी समजताच सर्वजण अजित पवार सुरक्षित असावेत, अशी प्रार्थना करत होते. मात्र, दुर्दैवाने धक्कादायक बातमी समोर आली. अजित पवारांचे व्यक्तिमत्त्व कार्यकर्त्यांना हवाहवसे वाटणारे होते. त्यांच्या कामाची पद्धत, प्रशासनावरची पकड आणि निर्णयक्षमता कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.
“बारामतीशी अजित पवारांचे अतूट नाते होते आणि त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा, हा विचित्र योगायोग आहे,” असे सांगत राऊत यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपूर्ण स्वप्नाबद्दलही खंत व्यक्त केली. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणले आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल केली; त्या प्रवासाचा असा अकाली अंत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते, असे राऊत म्हणाले.
अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून अजित पवारांचा नावलौकिक होता. पाटबंधारे, पाणी, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय होते. कॅबिनेट बैठकींना पूर्ण तयारीनिशी जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. रागाच्या क्षणीही विनोदाची फुंकर देऊन वातावरण हलके करण्याची कला त्यांच्याकडे होती, असेही राऊत यांनी सांगितले. “महाराष्ट्र आज खरोखरच दु:खात आहे. विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे आणि आता अजित पवार—अशी प्रमुख नेतृत्वे काळाने हिरावून नेली,” असे म्हणत राऊत यांनी शिवसेना परिवारतर्फे अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या घटनेने अस्वस्थ आणि शोकमग्न असल्याचे त्यांनी नमूद केले.





















