जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२६
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिपेक्स २०२६ (डिझाईन इनोव्हेशन अँड प्रोजेक्ट एक्स्पो) अंतर्गत विभागीय स्तरावरील ‘आयडिया प्रेझेंटेशन राऊंड’ शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या विभागीय फेरीत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ११ विविध थीममध्ये ८८ संघांमधील ३९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सामाजिक, औद्योगिक व तांत्रिक समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करत आपली संशोधनवृत्ती व सर्जनशीलता प्रभावीपणे मांडली.
या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. भरत अमळकर, अध्यक्ष (केशवस्मृती प्रतिष्ठान), श्री. नरेंद्र वाघ, उद्योगपती, प्रा. गिरीश कुलकर्णी, उपाध्यक्ष (अभाविप, देवगिरी प्रदेश) तसेच श्री. आर्यन भालशंकर, TSVK सह-संयोजक (जळगाव महानगर) यांचा समावेश होता. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.
डिपेक्स हा विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, गुणवत्ता आणि उद्योजकतेची मानसिकता विकसित करणारा एक प्रभावी व्यासपीठ असून, डिपेक्समध्ये सहभागी होणे ही एक जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण उपलब्धी ‘ग्लोबल अचीवमेंट’ मानली जाते. विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमांना योग्य दिशा देत त्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डिपेक्सच्या माध्यमातून प्रभावीपणे केले जात आहे.
डिपेक्स हा केवळ प्रकल्प प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमात्मक विचारप्रक्रियेचे सशक्त सादरीकरण करणारे व्यासपीठ आहे. विभागीय स्तरावरील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवकल्पना व उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होत आहे. या विभागीय फेरीतून निवड झालेले संघ राज्यस्तरीय डिपेक्समध्ये सहभागी होणार असून, राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धा दिनांक ५ ते ८ मार्च २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील एम. आय. टी. महाविद्यालयात संपन्न होणार आहे.




















