जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२६
पोलिस शिपाई पदाच्या १७१ जागांसाठी सुमारे १२ हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहे. दि. ११ फेब्रुवारीपासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीला सुरूवात होत आहे. त्याकरीता पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले असून भरती प्रक्रियेमध्ये ज्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य अथवा नातेवाईक आहे, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ या कालावधीत पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त एकूण १७१ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या पदांसाठी १२ हजार अर्ज दाखल झाले आहेत. या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीचा टप्पा दि. २० जानेवारीपासून सुरू होणार होता. मात्र काही जिल्ह्यांमध्ये जि.प. निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. आता जि.प. निवडणुका झाल्या असून दि. ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणीही होणार आहे. त्यामुळे निवडणुकांच्या बंदोबस्ताचाही ताण कमी होणार असल्याने पोलिस भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी दि ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले. सर्व प्रक्रिया पारदर्शक पार पडावी व कोणीही शंका उपस्थित करू नये, यासाठी पोलिस दलाने अगोदरच दक्षता घेतली आहे. त्यात बंदोबस्ताचे नियोजन करतानाच ज्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पाल्य, नातेवाईक भरती प्रक्रियेमध्ये उमेदवार आहे, अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाठवू नये, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.
पोलिस भरती प्रक्रियेसाठी कोणताही गैरप्रकार होऊ नये, म्हणून व्हिडिओ ग्राफरचीही नजर राहणार आहे. त्यासाठी ३८ व्हिडिओ ग्राफर तैनात केले जाणार असून प्रत्येक घडामोडींचे चित्रण केले जाईल. तसेच पोलीस भरतीच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास बंदी घातली आहे. पोलिस भरतीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांसह मुख्यालय, नियंत्रण कक्ष, शहर वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, एलसीबी, जिल्हा विशेष शाखा, डायल ११२, वेलफेअर, एएचटीयू, संगणक कक्ष अशा विविध शाखांकडून बंदोबस्त मागविला आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी या करीता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी दाखल असलेल्या अधिकारी अंमलदारांना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सूचना दित आढावा घेतला. तसेच त्यांनी मैदानी चाचणीसाठी तयार करण्यात आलेल्या मैदानाची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.




















