
जळगाव मिरर | २१ मार्च २०२६
शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याला उशीर झाल्याचा आणि त्यावर केवळ राजीनामा पुरेसा नसल्याचा जोरदार इशारा दिला आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, “रुपाली चाकणकरांनी अनेक महत्त्वाच्या महिला हक्कांच्या प्रकरणांत भूमिका स्पष्टपणे मांडणे अपेक्षित होते. पण वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे अशा प्रकरणांत त्यांची भूमिका संशयास्पद राहिली.” “कालाय तस्मै नमः” म्हणत, त्या म्हणाल्या की, अशा व्यक्तींना आदर करणे म्हणजे कालांतराने त्यांच्या चुका मान्य करणेच असते.
रोहिणी खडसे यांनी X (माजी Twitter) वर पोस्ट करत म्हटले, “गर्वाचे घर नेहमी खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल. म्हणून जास्त उडायचं नसतं! सगळा अहंकार धुळीस मिळेल!” त्या पुढे म्हणाल्या, “मा. मुख्यमंत्री महोदय आणि मा. सुनेत्रा पवार यांना विनंती आहे की, फक्त अध्यक्षांचा राजीनामा घेणे पुरेसे नाही. या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांना कठोर कारवाई करून कठोर खबरदारी घ्यावी. अजून काही गंभीर गोष्टी समोर येतील, त्यासाठी ‘Wait and Watch’.”
रोहिणी खडसे म्हणाल्या की, “रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा का झाला तरी त्याचा स्वीकार योग्य आहे. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. महिलांच्या हक्कांसाठी उभ्या असलेल्या संस्थांचा अपमान होऊ नये.”




















