
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
जिल्ह्यातील व परराज्यातील नागरिकांना विविध आमिषे दाखवून फसवणूक केल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका युवकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात बी.एन.एस.एस. अंतर्गत कलम 128 नुसार चॅप्टर प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक हा ठोस व्यवसायाशिवाय फिरत असून, अलीकडेच पिंप्रीअकाराऊत परिसरात त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीदरम्यान युवक व त्याच्या साथीदारांनी समाधानकारक माहिती दिली नसल्यामुळे संशय अधिक बळावला आहे. प्राथमिक माहितीनुसार, नागरिकांना नागमणी, काळी हळद, सुलेमानी दगड तसेच बनावट चलन यांचे आमिष दाखवून बोलावले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय किरकोळ चोरीतून उदरनिर्वाह केल्याचाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात आणखी दोन तरुणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासात समोर आली असून पोलिस त्यांचीही चौकशी करत आहेत.
दरम्यान, भविष्यात गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी संबंधित युवकावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी जामीनदारांमार्फत बंधपत्र घेणे तसेच बी.एन.एस.एस. कलम 135 नुसार इटेरियम बॉन्डची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.





















