
जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२६
शहरातील वाघ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आंबेडकर चौक येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात येत असून संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त सायंकाळी ७ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय हिंदू संघटनचे जिल्हाध्यक्ष तथा माजी प्राचार्य सुरेश वाघ सर यांचे मार्गदर्शन लाभणार असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील सर तसेच श्रीकृष्ण मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोकजी रंगलाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
१२ एप्रिल रोजी लहान मुले व महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी योगेश भालेराव सर यांचा सगीतमय ऑर्केस्ट्रा तसेच भीमजन्मोत्सव निमित्त केक कटिंग कार्यक्रम होणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता संविधान नगर येथून भव्य बाईक रॅलीला सुरुवात होऊन रेल्वे स्थानक येथील आंबेडकर स्मारक येथे समारोप होईल. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
ही माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज अडकमोल यांनी दिली असून सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





















