
जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२६
दोन दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेल्या अश्वीनी हर्षल वाघ (रा. लोहगाव, ता. शिंदखेडा) या महिलेने दिपीका संदीप पाटील (वय ३९, रा. शिवकॉलनी) यांच्या घरातून ९७हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी शिवकॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवकॉलनी परिसरातील रहिवासी दीपिका संदीप पाटील (वय ३९) या महिलेने त्यांच्या मावशीचे चुलत जावई हर्षल संजय वाघ यांनी नाशिक येथे नोटप्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून सन २०२२ मध्ये १४ लाख रुपये घेतले होते. नोकरी न लावल्याने सदर महिलेने त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र ते उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने दि. ४ एप्रिल रोजी महिला शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे वाघ यांच्याकडे पैसे घेण्यासाठी गेल्या मात्र ते घरी नव्हते. त्या वेळी हर्षल वाघ यांचे वडील संजय वाघ यांनी महिलेला २ लाख रुपयांचा धनादेश दिला. दि. ६ एप्रिल रोजी ती महिला थेरेपीसाठी गेलेली असताना अश्वीनी वाघ हिने घरातून ५ ग्रॅमची सोन्याची पोत, ४ व २ ग्रॅम अशा दोन अंगठ्या, चांदीची चेन, चांदीची अंगठी असे एकूण ९७ हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाली.
दीपिका पाटील या संध्याकाळी थेरेपी करून घरी आल्या त्या वेळी ही घटना लक्षात आली. याप्रकरणी त्यांनी दि. ७ एप्रिल रोजी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून अश्वीनी वाघ हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहेत. जळगावला परताना महिलेसोबत हर्षल वाघची पत्नी अश्वीनी वाघ हीदेखील आली. त्यानंतर वाघ याने महिलेला फोन करून त्याच्या पत्नीस दोन दिवस जळगावला राहू देण्याविषयी सांगितले. त्यानुसार त्याची पत्नी ४ ते ६ एप्रिलपर्यंत सदर महिलेच्या घरी राहिली.





















