
जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२६
शहरातील राजमालती नगरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या संशयिताने घरमालकाच्या घरातून ६२ हजार रुपये किमतीची चिलर मशीन आणि पाच मोटार मशिनरी चोरी करून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही चोरी १ एप्रिल रोजी घडली असून, मंगळवार ७ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविल्यानंतर अवघ्या पाच तासांत पोलिसांनी आरोपी नासिर निसार शेख (रा. शाहूनगर) व कार्तिक संजय मोरे (रा. नवीपेठ) यांना ताब्यात घेतले. तिसरा साथीदार अजूनही फरार आहे. दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजमालती नगरातील संजू बिसमिल्ला पटेल (वय ४९) यांनी भाडेकरू नासिर शेख याला दोन महिन्यांसाठी घरातील एक खोली दिली होती. १ एप्रिल रोजी संजू पटेल यांनी भाडे घेण्यासाठी नासिर शेख यांच्याकडे भेट दिली असता, त्यांच्या खोलीला कुलूप लावलेले होते, मात्र शेजारील खोली उघडी असल्याचे पाहून त्यांनी पाहणी केली. खोलीतील मशिनरी व सामान गायब असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चौकशी केली असता, नासिर शेखने सांगितले की, घरमालकाने मशिनरी व सामान विकले असून काही वस्तू घरी गहाण ठेवल्या आहेत.
तपासात असे समोर आले की, चोरीकारांनी पटेल यांच्या घरातून ३२ हजारांची चिलर मशीन आणि ५ मोटार मशिनरी (किंमत सुमारे ३० हजार) चोरी केली. संजू पटेल यांनी याबाबत मंगळवार ७ एप्रिल रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्हा नोंदविला. तपासासाठी पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांच्या शोधात पोलिसांनी पाळधी येथून नासिर शेख आणि त्याच्या राहत्या घरून कार्तिक मोरे यांना अटक केली. चोरी केलेली चिलर मशिन व दोन मोटार जप्त करण्यात आल्या.
या कारवाईस सहायक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतीश पाटील, दीपक शिरसाठ, योगेश पाटील, नंदलाल पाटील, अमोल ठाकूर, प्रणय पवार व राहुल पांचाळ यांनी मदत केली. अधिकाऱ्यांनी चोरी झालेल्या मालमत्तेच्या वस्तू जप्त करून आरोपींना न्यायालयात हजर केले, जिथे त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.





















