
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने संघटनात्मक स्तरावर हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटन बळकट करण्यासोबतच निवडणुकीसाठी आवश्यक नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे उपस्थित होते. यावेळी जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच उपाध्यक्ष यू. डी. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीत मतदार यादीचे व्यवस्थापन, तसेच SIR (Systematic Information Review) मॅपिंग या प्रक्रियेवर सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रभावी समन्वय राखण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) नियुक्तीला विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पक्षाच्या विविध स्तरांवर नव्याने जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना संघटन विस्तार आणि कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
या बैठकीस तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात विविध तालुका व शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. बैठकीच्या शेवटी, सर्व उपस्थितांनी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारसरणीला घराघरात पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.






















