
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२६
मित्रासोबत दुचाकीने प्रवास करत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव-विदगाव रोडवरील धामणगावजवळ घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंदन अजय गुजर (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) हे ९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांचा मित्र गोमा कुंभार याच्यासोबत दुचाकीने (एमएच १३ ईटी ९२२१) जळगाव ते विदगाव मार्गाने जात होते. धामणगावजवळ आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९ सी ७५३८) क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी ११ एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





















