
जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२६
शहरातील हॉकर्सच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक येथे आयोजित करण्यात आलेली बैठक उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत मनसे पदाधिकारी व नगरपथविक्रेता समिती सदस्यांनी एकत्र येत जळगाव शहरातील सुमारे ५००० हॉकर्स बांधवांच्या हक्कांसाठी ठोस लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीत महापालिका अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या मनमानी व दादागिरीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हॉकर्स बांधवांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या असून, या कारवायांमुळे त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रसंगी अतिक्रमण विभागाची कार्यपद्धती, फेरीवाला समितीने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचना, शहरात अधिकृत हॉकर्स झोन निश्चित करण्याची गरज, तसेच हॉकर्स बांधवांना सन्मानाने वागणूक देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हॉकर्सना कायदेशीर संरक्षण मिळावे व त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळावे, यासाठी लवकरच ठोस कृती आराखडा महापालिकेसमोर मांडण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी शहरातील हॉकर्स बांधवांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मोठा मोर्चा आयोजित करण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, नगरपथविक्रेता समिती सदस्य मोहन तिवारी, विशाल पाटील, दिनेश हिंगणे, मनसेचे उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, आशुतोष जाधव, विभाग अध्यक्ष खुशाल ठाकूर, शेतकरी सेनेचे प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक यांच्यासह हॉकर्स बांधव प्रतीक महाजन, लक्ष्मण दांडगे, विनोद पाटील, उमेश तळेले, विवेक महाजन, राजेश मराठे, संजय सोनार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतून स्पष्ट संदेश देण्यात आला की, हॉकर्स बांधवांवर होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. त्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून लढा देईल आणि हॉकर्सना सन्मानाने व्यवसाय करता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.





















