
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२६
जळगाव तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी आणि जलसंपदा विभागातून निवृत्त झालेले ६१ वर्षीय देविदास रामा कोळी यांची एटीएम केंद्रातच चलाखीने फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात भामट्याने एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ३१ हजार ३६९ रुपये काढून नेले. ही घटना २६ ते ३० मार्च दरम्यान घडली असून, याप्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देविदास कोळी हे २६ मार्च रोजी जळगाव शहरातील राजकमल टॉकीज परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएममधून २० हजार रुपये काढले. यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या हेल्मेटधारी व्यक्तीने त्यांना “बाबा, तुमचे एटीएम कार्ड दाखवा” असे म्हणत कार्ड हातात घेतले आणि चतुराईने त्यांचे कार्ड बदलले.
यानंतर ३० मार्च रोजी कोळी हे पुन्हा बँकेत ५० हजार रुपये काढण्यासाठी गेले असता, त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, २६ ते ३० मार्च दरम्यान वेगवेगळ्या एटीएममधून अज्ञात व्यक्तीने वेळोवेळी २ लाख ३१ हजार ३६९ रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. यावेळी कोळी यांनी आपल्या जवळील एटीएम कार्ड तपासले असता, त्यावर ‘अनुपकुमार श्रीवास्तव’ असे नाव असल्याचे दिसून आले, ज्यामुळे कार्ड बदलल्याची खात्री झाली.
या प्रकरणी देविदास कोळी यांनी १३ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक उल्हास चन्हाटे करत आहेत.





















