
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार दि.१५ एप्रिल रोजी शहरातील कोंबडी बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या ‘बहिणाबाई मार्ट’ ला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.
जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोंबडी बाजार येथील अल्प बचत भवनामध्ये ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यात आले आहे. या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्टमधील विविध स्टॉल्सना भेट देऊन तेथे विक्रीस ठेवण्यात आलेल्या वस्तूंची पाहणी केली.
यावेळी त्यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच, उत्पादनांच्या पॅकेजिंग, ब्रँडिंग व विपणनावर अधिक भर देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अशा उपक्रमांना अधिक चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, हरीश भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





















