
जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२६
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) अतिक्रमण हटविण्याबाबत दिल्या जाणाऱ्या नोटिसा इंग्रजीऐवजी मराठी भाषेतून द्याव्यात, अशी आग्रही मागणी सोमवारी जळगावात करण्यात आली. यासंदर्भात प्रकल्प संचालकांना निवेदन देऊन स्थानिक नागरिकांच्या भावना कळवण्यात आल्या.
जळगाव शहर आणि परिसरात महामार्गाच्या कामासाठी किंवा अतिक्रमण निर्मूलनासाठी NHAI मार्फत नागरिकांना नोटिसा बजावण्यात येतात. मात्र, या नोटिसा बहुतांश वेळा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः अल्पशिक्षित व्यापाऱ्यांना प्रशासकीय भाषेतील तांत्रिक शब्द समजत नाहीत. परिणामी, नेमकी काय कारवाई होणार आहे किंवा आपली बाजू कशी मांडायची, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते.
या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आशुतोष किशोरसाहेब जाधव यांच्या पुढाकाराने NHAI प्रशासनाला निवेदन देण्यात आले. “महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असताना आणि तसा शासन निर्णय असतानाही केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालयांनी स्थानिकांशी मराठीत संवाद साधणे अपेक्षित आहे. मराठीत नोटिसा मिळाल्यास नागरिकांना कायदेशीर बाबी समजतील आणि विनाकारण होणारे वाद टाळता येतील,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, पंकज चौधरी, राजेश मराठे, दीपक राठोड, राहुल चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.






















