
जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२६
जळगाव शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेली अॅपे रिक्षा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोधून काढत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सिव्हील हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ३ जवळील पार्किंगमधून MH19 BJ 4025 क्रमांकाची काळ्या-पिवळ्या रंगाची तीन चाकी अॅपे रिक्षा चोरीस गेली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे दि. १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना प्रभारी अधिकारी यांनी विशेष पथकाची स्थापना केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (वय ३२) हा संशयित असल्याचे निष्पन्न झाले. तो रामेश्वर कॉलनी, मेहरूण (जळगाव) येथील रहिवासी असून त्याच्याकडे पॅजो रिक्षा असल्याची माहिती मिळाली.
पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना पांडे डेअरी चौकातील एमएसईबी कार्यालयाजवळ संशयित रिक्षा आढळली. पोलिसांनी तत्काळ रिक्षा थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव कल्पेश इंगळे असे सांगितले. अधिक चौकशीत त्याने सिव्हील हॉस्पिटल परिसरातून रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. सदर रिक्षा अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक कमलेश पवार करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील, गोविंद साबळे, नरेंद्र दिवेकर आणि प्रविण जाधव यांनी सहभाग घेतला.






















