
जळगाव मिरर | २० एप्रिल २०२६
वरणगाव शहरात आज शोकमग्न झाले आहे. भोईवाडा परिसरातील रितेश रवींद्र धनगर (वय ३०) यांचे रविवारी पहाटे सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या त्यांच्या विवाह सोहळ्यामुळे घरात आनंद, उत्साह आणि लगबग सुरू असतानाच आलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी रितेश यांचा विवाह ठरलेला होता. घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमण्याऐवजी अचानक शोककळा पसरली. लग्नासाठी सजवले जाणारे घर क्षणात अश्रृंनी ओथंबून गेले. नातेवाईकांची वर्दळ, खरेदीची लगबग आणि आनंदाचे क्षण एका झटक्यात विरून गेले. हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे रितेश परिसरात लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली जाण्याने मित्रपरिवार, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. “असा उमदा मुलगा इतक्या लवकर जाईल, यावर विश्वास बसत नाही,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
रितेश हे रवींद्र सुपडू धनगर यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते. कुटुंबातील आधारस्तंभ अचानक निघून गेल्याने धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून वरणगाव शहरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे.





















