
जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२६
महावितरणने ग्राहकांसाठी वीजविषयक सर्व सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या डिजिटल सेवांचा वापर वाढावा, यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले आहे. 2025-26 आर्थिक वर्षात महावितरणच्या जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांनी डिजिटल पर्याय अवलंबून व तत्पर वीजबिल भरणा करून जवळपास 10 कोटी रुपयांची सवलत प्राप्त केली आहे. सर्व ग्राहकांनी वीजबिलाचे ऑनलाईन व प्रॉम्प्ट पेमेंट करून व गो ग्रीनमध्ये नोंदणी करून घसघशीत सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
महावितरणकडून ग्राहकांनी सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रक्कमेच्या (कर व शुल्क वगळून) जवळपास 1 टक्का तत्पर बिल भरणा सवलत, डिजिटल पद्धतीने ऑनलाईन (नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट/कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट/यूपीआय इ. वापरून) वीजबिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून) 0.25 टक्के डिजिटल बिल भरणा सवलत व गो ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारून छापील बिलाऐवजी ई-मेलवर वीजबिल घेतल्यास दरमहा 10 रुपये सवलत दिली जाते. गो ग्रीनमध्ये नोंदणी केल्यानंतर वर्षाची 120 रुपयाची सूट ही एकरकमी दिली जात आहे.
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांनी मावळत्या आर्थिक वर्षात तत्पर वीजबिल भरणा सवलत 6 कोटी 5 लाख 1 हजार 429, डिजिटल बिल भरणा सवलत 1 कोटी 50 लाख 50 हजार 192 व गो ग्रीन पर्याय निवडण्याची सवलत 2 कोटी 41 लाख 42 हजार 930 अशी एकूण 9 कोटी 96 लाख 94 हजार 551 रुपयांची सवलत मिळवली आहे. त्यात जळगाव मंडलातील ग्राहकांनी अनुक्रमे 3 कोटी 75 लाख 88 हजार 554, 90 लाख 98 हजार 755 व 1 कोटी 44 लाख 14 हजार 100 रुपये सवलत मिळवली आहे. धुळे मंडळातील ग्राहकांनी अनुक्रमे 1 कोटी 69 लाख 50 हजार 658, 41 लाख 61 हजार 933 व 62 लाख 44 हजार 740 रुपये सवलत मिळवली आहे, तर नंदुरबार मंडलातील ग्राहकांनी अनुक्रमे 59 लाख 62 हजार 218, 17 लाख 89 हजार 505 व 34 लाख 84 हजार 90 रुपये सवलत मिळवली आहे.
महावितरणने ग्राहकांना वीज बिल पाहणे व भरणे, तक्रार नोंदवणे, नवीन वीजजोडणी अर्ज, वीजभार व नाव बदलणे इ. सर्व सेवा महावितरण वेबसाईट, महावितरण ग्राहक मोबाईल ॲपद्वारे डिजिटल माध्यमातून सुरक्षित, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी या सेवांचा लाभ घेऊन नियमित व वेळेत ऑनलाईन वीजबिल भरावे तसेच वीजबिलांसाठी गो ग्रीन पर्याय स्वीकारावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
गो ग्रीनमध्ये असे व्हा सहभागी– गो-ग्रीन योजनेसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट करावे लागेल व छापील बिलाची प्रत रद्द करून संबंधितांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व इमेलवर दरमहा बिल पाठविण्यात येईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेल बदलण्याची सोय देखील त्याच ठिकाणी उपलब्ध आहे. गो-ग्रीन सहभागी झालेल्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईल ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही ऑनलाईन बिल भरणे सोयीचे झाले आहे. इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणक किंवा मोबाइलमध्ये जतन करून ठेवता येते. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.





















