
जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२६
शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने समीर नटवरलाल शहा (वय ६२) यांचा विश्वास संपादन करुन त्यांना ३९ लाख रुपयात गंडविले. हा प्रकार दि. २० एप्रिल रोजी उघडकीस आल्यानंतर शहा यांनी लागलीच सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात तीन सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे सत्र सुरूच असल्याने त्यांचा शोध घेण्यास सायबर पोलीस अपयशी ठरू लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ रोडवरील नागेश्वर कॉलनी रहिवासी समीर नटवरलाल शहा (वय ६२) या व्यापाऱ्याला दि. १६ मे २०२५ ते दि. ३ मार्च २०२६ या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. यामध्ये ‘काहिरा मेहता’, ‘हेमंत मेहता’ आणि ‘सीएपीटी कस्टमर सर्व्हिस’ या नावांच्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. संबंधित संशयितांनी आपण सीएपीटी शेअर्स मार्केटिंग कंपनी, युके चे मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ, असे आमिष त्यांनी दाखविले. शहा यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी त्यांना काही रक्कम गुंतवण्यास सांगितली. त्यावर तातडीने १० हजार रुपये नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. एकदा विश्वास बसल्यानंतर, संशयितांनी समीर शहा यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. जादा नफ्याच्या आमिषाला बळी पडून शहा यांना वेळोवेळी एकूण ३९ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर कोणताही नफा किंवा गुंतवलेली मुद्दल परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी समीर शहा यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी समीर शहा यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.





















