
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२६
महापालिकेच्या व्यापारी संकुलामधील गाळ्यांचा प्रश्न सोडविण्यात यावा, तसेच रस्त्यांसाठी २०० कोटी व मनपावर दाखल भुसंपादनाच्या दाव्यांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी जळगाव मनपाला मिळावा, अशी मागणी महापौर दीपमाला काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील व्यापारी संकुलांमधील २३६८ गाळेधारकांच्या भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न २०१२ पासून रेंगाळलेला आहे. गाळेधारकांच्या मागणीनुसार २ ते ३ टक्के दराने भाडे निश्चित करावे, तसेच मुदत संपल्यापासून नवीन दर आकारणी करण्याकामी शासन स्तरावरून करण्यात यावेत, अशी मागणी महापौर दीपमाला काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. जमीन संपादनाच्या मोबदल्यासाठी अनेक याचिका दाखल असून त्या पोटी महापालिकेला सुमारे २०० कोटी रुपये भरणे अनिवार्य आहे. ही रक्कम न भरल्यास महापालिकेची बँक खाती जप्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. खाती जप्त झाल्यास शहरातील अत्यावश्यक नागरी सेवा कोलमडतील, हे लक्षात घेऊन महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे २०० कोटींच्या विशेष निधीची मागणी केली. यावर मुख्यमंत्री यांनी तातडीने न्यायालयीन वादाच्या सर्व प्रकरणांची सविस्तर माहिती मागविली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून शहराच्या अनेक भागांत, विशेषतः उपनगरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जनतेचा वाढता संताप आणि महापालिकेची रिकामी तिजोरी पाहता, रस्ते विकासासाठी अतिरिक्त २०० कोटींचा निधी द्यावा, अशी विनंती महापौरांनी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आता व्यापारी आणि नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.





















